जळगाव मिरर । २१ नोव्हेंबर २०२५
ड्युटी संपल्यानंतर घरी जाण्यासाठी ते महामार्गाच्या कडेला बसची वाट पाहत उभे होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेलया मनोज त्र्यंबक शिरसाळे (वय ५३, रा. गाडेगाव, ता. जामनेर) यांचा बुधवारी रात्री दहा वाजता उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे मनोज शिरसाळे हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होते. सुप्रिम कंपनीत कंत्राटी पध्दतीने ते नोकरीला होते. गुरूवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी हे त्यांच्या खासगी कामासाठी नेरी गावात गेले होते. काम आटोपून रात्री ८ वाजता ते घरी जाण्यासाठी नेरी येथील महामार्गावर उभे होते. त्यावेळी जळगावकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स १०६८) ने मनोज शिरसाळे यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.
पाठलाग होत असल्याने वाहन सोडून काढला पळ वाहनाच्या धडकेत महामार्गावर उभा असलेले मनोज शिरसाळे हे गंभीर जखमी झाल्याचे दिसता, तो प्रकार पाहून वाहन चालक तेथून पसार झाला.. त्यामुळे येथील काही संतप्त तरूणांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यावरील उमाळे फाट्याजवळ चालकाने वाहन थांबवून लॉक करून पळ काढला. जखमी झालेल्या मनोज शिरसाळे यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रात्री १० वाजता त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















