जळगाव मिरर | २१ नोव्हेंबर २०२५
राज्यातील जालना शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील सीटीएमके गुजराती विद्यालयातील एका 13 वर्षीय विद्यार्थिनी शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पण विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेची गोष्ट ठरत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जालन्याच्या सीटीएमके गुजराती विद्यालयातील एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारत मृत्युला कवटाळले आहे. आरोही दीपक बिर्लान असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता आठवीत शिकत होती. आज सकाळी शाळेची प्रार्थना झाली. त्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात जात होते. आरोही देखील आपल्या वर्गात गेली होती. त्यानंतर तिने अचानक उडी मारली. हा प्रकार घडला तेव्हा सर्व शिक्षक प्रार्थनेसाठी खाली मैदानात होते. त्यानंतर आम्ही तत्काळ तिला रुग्णालयात हलवले. सकाळी 7.30 ते 8 च्या सुमारास हा प्रकार घडला, अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. आरोही दीपक बिर्लान या इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनीने आज सकाळी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. ही मुलगी मस्तगड जालना येथे राहत होती. आम्हाला रुग्णालयातून एमएलसी प्राप्त झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आरोहीच्या वडील दीपक बिर्लान यांनी सांगितले की, माझी मुलगी सकाळी 7 वाजता शाळेत गेली होती. त्यानंतर साडेसातच्या सुमारास शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्या मुलीने वरून उडी मारल्याचा फोन आला. त्यानंतर मी धावतपळत शाळेत गेलो. पण तोपर्यंत तिला रुग्णालयात हलवण्यात आले होते. मी तिथे पोहोचलो असता तेथील डॉक्टरांनी सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी तिला सरकारी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. मुलीचे घरी कुणाशी भांडण झाले नव्हते. तिने अचानक हे पाऊल का उचलले हे समजत नाही, असे ते म्हणाले.




















