जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२५
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या दरम्यान शब्दयुद्ध चांगलेच पेटले आहे. महाजन यांनी “रोहित पवार हे आजोबांच्या कडीखांद्यावर खेळून आमदार झाले” अशी टीका करताच रोहित पवारांनी विकासाच्या मुद्यावरून महाजनांची कोंडी केली आहे.
जळगावमधील जामनेर नगरपरिषदेत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर वाद अधिक चिघळला. काही उमेदवारांना जबरदस्ती अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप होत असून त्याचे व्हिडिओ रोहित पवारांनी प्रसारित केले होते. त्यानंतर महाजन यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले होते की “पोटच्या मतांवर जेमतेम जिंकलेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये.”
याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पलटवार करताना महाजनांना थेट प्रश्न विचारला— “जळगावमध्ये एकतरी उद्योग आणला का? एवढं मोठं पद असूनही आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय केलं?” तसेच जामनेरमधील विकासाभावी लोकांनी स्वतः पाहिलेल्या परिस्थितीची आठवण करून देत त्यांनी महाजनांची खिल्लीही उडवली.
पवार पुढे म्हणाले, “बाबांच्या खांद्यावर कडेवर खेळायला नशीब लागतं. आम्ही नशिबवान आहोत; आजोबा पवारसाहेब लाभले. मात्र तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला आम्ही 40 हजारांनी पराभूत केलं होतं. यावेळीही तसंच झालं असतं, पण तुम्ही vote चोरी केली.” त्यांनी महाजन व राज्य सरकारवर धार्मिक भावनांच्या नावाखाली राजकारण केल्याचा आरोप करत “नाशिक कुंभमेळ्यातील फुगवलेल्या टेंडरांची” चौकशी करण्याचीही धमकी दिली. दरम्यान भुसावळ येथील सभेत गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर घराणेशाहीचा आरोप पुन्हा अधोरेखित केला होता. त्यांनी सांगितले की, “भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जमिनीवरून उभं राहिलो. आजोबांच्या आणि काकांच्या पुण्यावर नाही.” या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाजन–पवार संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.





















