जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२५
वर्धा जिल्ह्यातील सेलूकाटे परिसरातील भोयर कुटुंबावर काळाने घाला घालत तीन जीव एका क्षणात हिरावून घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा–सेलूकाटे मार्गावरील नवोदय विद्यालयाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत पती-पत्नी आणि 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सहा वर्षीय मुलगा कान्हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये सेलूकाटेतील सोमनाथ भोयर (38), निकिता भोयर (32) आणि मुलगा पूरब (12) यांचा समावेश आहे. भोयर कुटुंब गणेशनगर येथील एका कार्यक्रमावरून घरी परतत असताना वायगाव येथील चारचाकी वाहनाने जबरदस्त धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाला. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र तिघांना वाचवता आले नाही. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेने सेलू आणि काटे परिसरात शोककळा पसरली आहे. एका सुखी कुटुंबाचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.





















