जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार : जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष द्यावे
जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. सिझेरियन प्रसुतीनंतर मातांना सुट्टी मिळून त्या घरी जात असताना त्यांच्या नवजात बालकांना काही तांत्रिक कारणांमुळे काचेच्या पेटीत (वॉर्मर/एनआयसीयू विभागात) ठेवले जाते मात्र, अशा वेळी मातांना स्वतःसाठी साधा कॉटसुद्धा उपलब्ध करून दिला जात नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या मजल्यावर झोपून दिवस काढावे लागत आहेत. या अमानवी परिस्थितीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे. अनेक नातेवाईकांनी संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तातडीने हस्तक्षेप करून व्यवस्था सुधारावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे.
प्रसुतीनंतरची अवस्था अत्यंत नाजूक असते. शरीरातील वेदना, अशक्तपणा आणि मानसिक थकवा अशा अवस्थेत मातेला विश्रांतीची सर्वाधिक गरज असते. परंतु जिल्हा रुग्णालयात मातांसाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे त्या थेट जमिनीवर झोपण्याची वेळ येत आहे. कधी-कधी दोन दिवस सतत खुर्चीवर बसूनच नवजात बालकाच्या उपचाराची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले. काही महिलांनी सांगितले की, आम्ही स्वत: वेदनांनी व्याकुळ आहोत. शस्त्रक्रियेनंतर उभे राहणेही अशक्य होत असताना जमिनीवर कशी झोपायचे? तरीही आमच्यावरच जबाबदारी ढकलली जाते. या अवस्थेत रुग्णालयातील स्वच्छतेचाही मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. जमिनीवर झोपणे म्हणजे संक्रमणाचा धोका अधिक असतो. बाळाच्या उपचारादरम्यान मातेलाच रुग्ण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अंघोळीची सुविधाही उपलब्ध नाही
नवजात बालकांना वारंवार स्तनपानाची गरज असते. मात्र काचेच्या पेटीत ठेवलेल्या बालकाला मातेला दिल्या जाणाऱ्या वेळेत आणि पद्धतीत अनेक त्रुटी असल्याचे नातेवाईक सांगतात. अंघोळी (प्रायव्हसी) नसल्याने मातांना अस्वस्थ परिस्थितीत बसून स्तनपान करावे लागते. काही महिलांना तर खोलीत जागा मिळत नसल्याने वॉर्डच्या बाहेरील भागात हे करावे लागते, असा आरोप करण्यात आला आहे.
व्यवस्थेतील बेजबाबदारपणा
रुग्णालयात पुरेशा सुविधा असूनही त्यांचा योग्य वापर न केल्याची चर्चा रुग्णांमध्ये रंगली आहे. काहींच्या मते, नवजात शिशु विभागात उपलब्ध असणारे बेड दुरुस्तीत असल्याचे कारण देऊन मातांना बाहेर थांबवले जाते. तर काही वॉर्डमध्ये जागा असूनही ‘गर्दी’चे कारण देत नातेवाईकांना परवानगी दिली जात नाही. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर महिलांना किमान दोन ते तीन दिवस भरपूर काळजीची आवश्यकता असते. डॉक्टरांच्या सूचनांनुसार त्या बसणे, वाकणे, जोर लावणे टाळतात. पण रुग्णालयातील व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याचा अधिकच ऱ्हास होत असल्याचे दिसत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
या संपूर्ण घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या संदर्भात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वत: चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मातांसाठी मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





















