जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२५
आठवडाभरापासून सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भाववाढीस मंगळवारी (२ डिसेंबर) अखेर ब्रेक बसला. सोन्याच्या दरात तब्बल १,६०० रुपयांची घसरण होऊन तो ₹१,२७,६०० प्रति तोळा इतका झाला आहे. तर चांदीतही १,५०० रुपयांची घट नोंदली गेली असून दर ₹१,७७,५०० प्रति किलो इतका झाला आहे.
जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात दलालांकडून विक्री वाढल्यामुळे बुलियन मार्केटमध्ये घसरण झाली आहे. नोव्हेंबर अखेरपासून सोने-चांदीच्या दरात सलग वाढ होत होती. २५ नोव्हेंबर रोजी सोने २,३०० रुपयांनी उसळी घेऊन ₹१,२५,३०० वर पोहोचले. त्यानंतर दररोज वाढ होत १ डिसेंबरला ते ₹१,२९,२०० पर्यंत गेले होते. मात्र २ डिसेंबरला अचानक घसरण होऊन दर ₹१,२७,६०० वर आला.
चांदीच्या भावातही मोठ्या चढउतारांचा अनुभव आला. २५ नोव्हेंबरला ३,५०० रुपयांच्या वाढीसह चांदी ₹१,५८,५०० वर गेली होती. त्यानंतर सात दिवसांत तब्बल ₹२३,००० ची वाढ होऊन ती १ डिसेंबरला ₹१,७८,००० पर्यंत पोहोचली. मात्र २ डिसेंबर रोजी ₹१,५०० रुपयांची घट होऊन चांदीचा दर ₹१,७६,५०० प्रति किलो झाला. भावातील ही घसरण सध्या खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरत असून बाजारात पुन्हा खरेदीचे वातावरण तयार झाले आहे.





















