जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५
नाशिक जिल्ह्यातील तपोवन परिसरातील 1800 झाडतोडीच्या प्रस्तावावरून रंगलेला वाद आता राजकीय आणि धार्मिक वळण घेताना दिसत आहे. 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्याच्या तयारीत प्रशासन गुंतले असताना, प्रस्तावित झाडतोडीला पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक आणि अनेक सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. तपोवन हे शहराचे महत्त्वाचे हरितवैभव मानले जात असल्याने झाडतोडीमुळे परिसराचे पर्यावरणीय संतुलन बिघडेल, अशी नागरिकांची भूमिका आहे.
दरम्यान, या वादावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण अधिक तापले आहे. सोशल मीडियावर त्यांनी पर्यावरणवाद्यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला की, “झाडतोडीवर आवाज उठवणारे ईदच्या वेळी होणाऱ्या बकरी हत्येवर गप्प का राहतात?” त्यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक संदर्भ पुढे आल्याने वादाची तीव्रता वाढली आहे.
राणे यांनी माध्यमांशी बोलताना आणखी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “झाडांना मिठी मारणारे बकर्यांना मिठी का मारत नाहीत? ईदला रक्त वाहते तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे जाते?” त्यांनी झाडतोडीला पाठिंबा नसल्याचे सांगितले, मात्र विरोधकांनी सर्व धर्मांबाबत समान भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
राणेंच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने या वक्तव्याला “धर्माला मुद्दाम ओढून आणणारा प्रयत्न” ठरवत टीका केली. “झाडतोड हा पर्यावरणाचा विषय असून धर्म यात ओढू नये. टिल्लू-लेव्हल बुद्धीत इतका गंभीर विषय समजत नाही,” अशा कडव्या शब्दांत पक्षाने प्रत्युत्तर दिले.
दरम्यान तपोवन परिसरातील झाडतोडीविरोधात नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यांचे म्हणणे आहे की, साधूग्रामसाठी झाडांना बळी न देता पर्यायी जागेचा विचार करावा. शहराचे तापमान वाढत असताना हजारो झाडे तोडणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
नाशिकचा कुंभमेळा हा धार्मिक-सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा असला, तरी त्यासाठी निसर्गाची हानी करू नये, असा लोकांचा विरोध कायम असल्याचे दिसत आहे. झाडतोड, पर्यावरण आणि आता धार्मिक–राजकीय वादामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




















