कान नाक घसाशास्त्र विभागातर्फे कार्यशाळेत विद्यार्थ्यांना धडे
जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे कॉक्लिअर इम्प्लांटची दुसरी शस्त्रक्रिया २२ महिन्याच्या बालिकेवर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबाबत धडे देण्यात आले.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ईएनटी विभागाच्या अनुभवी टीमद्वारे ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नागपूरहून आलेल्या कॉक्लिअर इम्प्लांट तज्ज्ञ डॉ. कांचन तडके यांनी ही शस्त्रक्रिया कौशल्यपूर्णरीत्या पूर्ण केली. जळगाव तालुक्यातील २२ महिन्यांच्या बालिकेला जन्मतःच दोन्ही कानांनी ऐकू येत नव्हते. तिचे आई-वडील व्यवसायाने शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत.
कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची किंमत साधारण १० लाख रुपये असूनही ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. या उपचारामुळे बालिकेला पहिल्यांदाच आई-वडिलांचा आवाज ऐकण्याची संधी मिळणार असून तिच्या आयुष्यात हा क्षण “नवजीवन” ठरणार आहे.
या प्रसंगी आयोजित कॉक्लिअर इम्प्लांटेशन कार्यशाळेत जळगावचे ज्येष्ठ सर्जन डॉ. विद्याधर दातार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पहिली कॉक्लिअर इम्प्लांट करण्यात आलेल्या बालिकेचाही पालकांसह सत्कार करण्यात आला. वेदश्रीच्या प्रगतीचे कौतुक करत तिच्या पालकांनी महाविद्यालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. दोन कॉक्लिअर इम्प्लांट मुलींची एकत्र उपस्थिती हा कार्यक्रमातील सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला.
कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी आणि प्रतिनिधींना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया प्रक्रिया दाखवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यशाळेचे परीक्षण प्रख्यात सर्जन डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले. शस्त्रक्रिया व कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या कान नाक घसाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश्री चौरपगार, डॉक्टर अक्षय सरोदे, डॉ. ललित राणे, डॉ. विनोद पवार, डॉ. यश शिसोदे, डॉ. स्नेहल सावंत, डॉ. किरण गोरे, ऑडिओलॉजिस्ट मूनज्जा शेख, रेडिओलॉजिस्ट डॉ. वरूण निमजे, भुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर, डॉ. अंजू पॉल आदींनी परिश्रम घेतले.




















