
जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५
शहरातील एम.आय.डी.सी. येथील भारत पेट्रोलियम लि. येथील एलपीजी रिफीलींग प्लॉट मधील अधिकृत माथाडी कामगार गेल्या २० वर्षापासून घरगुती सिलेंडर लोडिंग-अनलोडिंगचे काम करत आहेत. दि.२ डिसेंबर २०२५ रोजी नगरपालिका निवडणूकीचे मतदान होते, मतदानासाठी काही कामगारांनी सुटी घेतली म्हणून येथील प्रशासनाने संपूर्ण ४० अधिकृत माथाडी कामगारांना कंपनी आवारात प्रवेश नाकारून काम करण्यास मज्जाव केला आहे. सदर कामगारांवर काम बंद झाल्याने उपासमारीचे वेळ आल असून परिवार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत दि.५ रोजी जिल्हाधिकारी यांनी संयुक्त बैठक बोलविली होती. यात ४० कामगारांना तत्काळ कामावर घेण्याचे निर्देश देण्याचे निर्देश डॉ.रा.दे. गुल्हाने, सहा. कामगार आयुक्त तथा अध्यक्ष जळगाव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव यांनी संबंधीतांना दिले होते. त्यांच्या या आदेशालाही कंपनी प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.
लोकशाही पद्धतीचे संरक्षण आणि प्रत्येक मतदारास मतदानाचा हक बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १२५ (बी) नुसार निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदारांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य असून, जळगाव जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्देश जारी केले होते. या अनुषंगाने दि. २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतदानासाठी माथाडी कामगारांनी ‘बीपीसीएल’ व्यवस्थापनास पूर्वसूचना देऊन कायदेशीररीत्या रजा घेतली होती. मात्र जिल्हा प्रशासन व कामगार आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशाची सदर कंपनी प्रशासनाने पायमल्ली केली आहे. माथाडी कामगार संघटना अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी कामगारांची बाजू मांडत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देऊन कामगारांना न्याय मिळावा अशी मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी व सहा कामगार आयुक्त डॉ.रा.दे. गुल्हाने यांनी सर्व वाहतूक ठेकेदार, ट्रान्सपोर्टर, डिलर भारत पेट्रोलियम व हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.एम.आय.डी.सी. जळगाव यांना दि.५ डिसेंबर रोजी बैठक बोलविली होती. या बैठकीस ४२ पैकी दोनच ठेकेदार उपस्थित होते. कंपनी प्रशासन अधिकृत कामगारांना प्रवेश बंदी करून अनोंदीत काम करून घेत असल्याने सहा. कामगार आयुक्त श्री. गुल्हाने यांनी कायद्यानुसार नोंद असलेल्या कामगारांकडूनच काम करून घेण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात तक्रारी आल्यास दोषींवर कारवाईची तयारी दर्शविली. त्यानं ४० कामगारांना तातडीने कामावर घेण्याचे निर्देश दिले होते. तरी सुध्दा अद्याप कामगारांना कामावर न घेतल्याने सदर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज दि.८ रोजी जिल्हाधिकारी यांनी पुन्हा संयुक्त बैठक बोलिविली असून या बैठकीत माथाडी कामगारांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज पुन्हा बोलविली बैठक !
भारत पेट्रोलियम लि.एम.आय.डी.सी. जळगाव येथील एलपीजी रिफीलींग प्लॉट मधील अधिकृत माथाडी कामगारांना प्रवेश नाकारून काम करण्यास मज्जाव केल्यासंदर्भात व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज दि.८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक बोलविले असल्याचे पत्र (बैठकीची सुचना) महेश चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, सहा कामगार आयुक्त, व्यवस्थापक भारत पेट्रोलियम एमआयडीसी जळगाव, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र माथाडी व इतर श्रमजीवी असंरक्षीत व असंघटीत कामगार संघटना जळगाव यांना कळविले आहे.




















