जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२५
लग्न जुळवून देण्याच्या आमिषाने अडीच लाख रुपये उकळून तोतया नवरीने लग्नानंतर चौथ्याच दिवशी अंगावरील दागिन्यांसह पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार वाघळी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवरीसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, वाघळी येथील ३० वर्षीय तरुणाच्या विवाहासाठी त्याचे कुटुंबीय मुलीचा शोध घेत होते. दरम्यान वाघळीतील एका महिलेची त्यांच्याशी ओळख झाली. तिने गरीब कुटुंबातील मुलगी शोधून देण्याची तयारी दर्शविली मात्र त्यासाठी खर्च लागेल, असे सांगून अडीच लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबाने होकार दिल्यानंतर त्या महिलेने अकोला येथे आरती गोपाल चौपाडे हिची ओळख करून दिली.
४ जून २०२५ रोजी तरुण व त्याचे कुटुंबीय मुलगी पाहण्यासाठी अकोला येथे गेले. आरती पसंत पडल्याने विवाहाचे बोलणे पक्के करण्यात आले. त्यानंतर वाघळीतील कमळेश्वर मंदिरात तरुण व आरती चौपाडे यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्न जुळवून देणाऱ्या महिलेच्या सांगण्यानुसार मुलाच्या कुटुंबीयांनी तिला अडीच लाख रुपये दिले.
लग्नानंतर तीन-चार दिवस आरती वाघळी येथे राहिली. चौथ्या दिवशी तिने बहिणीची तब्येत खराब असल्याचे सांगून माहेरी जाण्याचा बहाणा केला. नवरदेव तिला अकोला येथे घेऊन गेला असता ती त्याची नजर चुकवत पळ काढला. अनेक दिवस उलटूनही आरती परत न आल्याने तिचा शोध घेण्यासाठी तरुणाचे कुटुंब अकोला येथे गेले. मात्र तिथे त्यांना ‘तुम्ही शोध घेण्यास आला तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी आरती गोपाल चौपाडे उर्फ आरती रवींद्र माळी (अकोला), सुनंदाबाई विश्वनाथ गायकवाड, मनीषा मानधनी, वर्षा नादापुरे आणि राजू विश्वनाथ गायकवाड या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















