जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५
शहरातील कालिका माता परिसरात शुक्रवारी (दि. १९) पहाटे भीषण आगीची घटना घडून परिसरात मोठी खळबळ उडाली. काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ, स्टेट बँकेसमोरील पत्र्याच्या शेडखाली असलेल्या काही दुकानांना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.
आगीचे लोळ काही मिनिटांतच वेगाने पसरले. त्यामुळे पत्र्याच्या शेडखालील सलग असलेली दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेत व्हीनस ऑप्टिकलचे गणेश राणे, भगवती ऑटोमोबाईलचे पुष्पक खडके, श्री विघ्नहर्ता स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसेसचे भूषण वाघुळदे तसेच सखी मॅचिंग सेंटरचे प्रदीप खडके यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे भगवती ऑटोमोबाईलचे मालक पुष्पक खडके यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वीच स्पेअर पार्ट विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, पहिल्याच आठवड्यात आगीच्या दुर्घटनेने त्यांच्या नव्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत दुकानांतील साहित्य, मालसामान आणि उपकरणे जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.





















