जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२५
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत युती जाहीर करत बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
यावेळी ठाकरे बंधूंनी प्रतिस्पर्ध्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त करत मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या समर्थकांची राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची दीर्घकालीन इच्छा आज राजकीयदृष्ट्या पूर्ण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. या एका वाक्यापासूनच आम्ही एकत्र येण्याची सुरुवात केली.” जागावाटपाबाबत सध्या कोणताही आकडा जाहीर केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी, “जे उमेदवार निवडणूक लढवतील, त्यांना दोन्ही पक्षांची संयुक्त उमेदवारी असेल,” असे सांगितले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करत त्यांनी, “महाराष्ट्रात सध्या राजकीय पक्षांमधून उमेदवार पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत,” असा टोलाही लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी एकजुटीवर भर देत म्हटले, “आज केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देश या घटनेकडे पाहत आहे.” भाजपच्या “बटेंगे तो कटेंगे” या प्रचाराचा संदर्भ देत त्यांनी मराठी माणसांना इशारा दिला की, “आता चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका.”
मराठी माणसाच्या ताकदीवर विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठी माणूस कुणाच्या वाटेला जात नाही; पण त्याच्या वाटेला कुणी आला, तर त्याला परत जाऊ देत नाही.” या युतीमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.





















