जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेला चौथ्या दिवशी गती मिळाली असून प्रथमच अर्ज दाखलीचा आकडा दोन अंकी गाठला आहे. शनिवारी विविध प्रभागांतून एकूण २४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले, त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येण्याचे संकेत मिळाले आहेत.
भाजपच्या माजी महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्यासह विरण खडके, सुरेखा तायडे, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ज्योती चव्हाण, विश्वनाथ खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, गौरव ढेकळे, अनिता सुरेश भापसे, मनोज दयाराम चौधरी, मोहीत प्रेमकुमार बालाणी, शेख शाहिद शेख सादीक यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय हालचालींना चालना मिळाली आहे.
शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी शहरातील १९ प्रभागांतून २३५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी २४ अर्ज दाखल करण्यात आले. यापूर्वी तीन दिवस अर्ज विक्री मोठ्या प्रमाणात झाली असली तरी अर्ज दाखलीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र चौथ्या दिवशी दाखलीत वाढ झाल्याने पुढील दिवसांत उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नामनिर्देशन प्रक्रियेत कागदपत्रांची पूर्तता व तांत्रिक बाबी असल्याने अनेक इच्छुक उमेदवार शेवटच्या दिवसांची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अर्ज दाखल करण्याचा वेग अधिक वाढेल, असा अंदाज निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दि. २३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत चार दिवसांत एकूण २,०५४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. पहिल्या दिवशी ७७७, दुसऱ्या दिवशी ६१८, तिसऱ्या दिवशी ४२४ तर चौथ्या दिवशी २३५ अर्जांची विक्री झाली आहे.
प्रभागनिहाय पाहता काही प्रभागांत अर्ज दाखलीचा उत्साह अधिक दिसून आला. प्रभाग क्रमांक १६ मधून सर्वाधिक ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर प्रभाग क्रमांक १३ आणि १५ मधून प्रत्येकी ४ अर्ज दाखल झाले. इतर काही प्रभागांत अर्ज विक्री झाली असली तरी अद्याप एकही अर्ज दाखल न झाल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत चित्र स्पष्ट होणार असून जळगाव मनपा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.




















