निंभोरा ता. रावेर : प्रतिनिधी
निंभोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या सहा महिने ते वर्षभरापासून तब्बल ०९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून ती पदे तात्काळ न भरल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकू असा इशारा रावेर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी मनीषा बांगर यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी दिला. यावेळी सोबत राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,दिवाकर चौधरी,पांडुरंग पाटील,ईश्वर निळे,भागवत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,निंभोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या ०६महिने ते ०१ वर्षापासून ०६ आरोग्य सहाय्यक पर्यवेक्षिका,०२आरोग्य सहाय्यीका व ०१ आरोग्य सहाय्यक अशी एकूण ०९पदे या प्रा आ केंद्रात रिक्त आहेत यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ०५ उपकेंद्र असून त्यात खिर्डी बु,खिर्डी खु,दसनुर,बलवाडी व वाघोदा यांचा समावेश आहे. या प्रा आ केंद्रावर ४०हजार लोकसंख्येची जबाबदारी असतांना येथे तब्बल ०९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.त्यातच या प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षभरापासून पाण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांची अक्षरशः पाण्यासाठी हेळसांड होऊन रुग्णांच्या नातेवाईकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.असे असतांना आरोग्य विभागाने या सर्व अडचणींकडे लक्ष देण्याची मागणी करीत याकडे दुर्लक्ष झाल्यास व रिक्त पदे लवकर न भरल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टाळे ठोकण्यात येईल असा इशारा तालुका वैद्यकीय अधिकारी मनीषा बांगर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी बांगर यांनी निंभोरा प्रा आ केंद्रात डॉ अजय रिंडे यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती जाणून घेतली.
या संदर्भात उद्या जळगाव येथे बैठक असून त्यात निंभोरा येथील सदर प्रा आ केंद्राच्या अडचणी मांडून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करणार आहोत.तसेच हा केंद्राच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने भेट देऊ.
– डॉ.मनीषा बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी,रावेर
