जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महापालिका परिसरात मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची मुलगी डॉ. अमृता सोनवणे व मुलगा डॉ. गौरव सोनवणे, माजी उपमहापौर कैलास सोनवणे यांची मुलगी प्रतिक्षा सोनवणे व मुलगा कल्पेश सोनवणे, माजी महापौर विष्णु भंगाळे, नितीन लढ्ढा, सीमाताई भोळे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. मनपा निवडणुकीसाठी सोमवारी एकूण तीन माजी महापौरांसह डॉ. चंद्रशेखर पाटील, नितीन बरडे, जितेंद्र मराठे, अॅड. दिलीप पोकळे, सुनील खडके, मनोज चौधरी, गायत्री राणे यांच्यासह सुमारे २५० इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १० मधील ‘अ’ जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कलाबाई नारायण शिरसाठ यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, या प्रभागातील सर्व जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सोडण्यात आल्यामुळे आपल्याला उमेदवारी न करण्याचा दबाव असल्याचा आरोप कलाबाई शिरसाठ यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले असून ती जागा आपल्यासाठी राखावी, अशी मागणी पक्षाचे नेते संतोष चौधरी यांच्याकडे केली होती. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी प्रभाग क्रमांक १० मधील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने सोमवारी मोठ्या संख्येत इच्छुकांनी गर्दी केली होती. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उमेदवार, समर्थक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून अर्ज स्वीकारले जात होते. तपासणीस वेळ लागत असल्याने सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते.





















