जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असून अद्याप महायुतीसह महाविकास आघाडीने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून आज मनपा इमारतीत उमेदवारांची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
शेवटच्या दिवशी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू असून, पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक प्रभागांमध्ये निष्ठावंत व जुने कार्यकर्ते उमेदवारीच्या प्रतीक्षेत असताना, अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या आजी-माजी नेत्यांना उमेदवारी दिल्यास नाराजीचा सूर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा असली तरी, काही प्रभागांत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याची भावना आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरून अंतिम निर्णय लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवार, समर्थक व पक्ष कार्यकर्त्यांची मनपा इमारतीत मोठी गर्दी होणार असून, राजकीय घडामोडींवर दिवसभर लक्ष केंद्रित राहणार आहे.





















