जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२५
धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची गुणवंत बॉक्सर प्राजक्ता शिंदे हिची राष्ट्रीय वरिष्ठ महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे पार पडलेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघाच्या निवड चाचणीत प्राजक्ता शिंदे हिने ५७ ते ६० किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपली निवड निश्चित केली.
या निवडीमुळे प्राजक्ता शिंदे हिला जानेवारी २०२६ मध्ये ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या ९व्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. ही निवड महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्राजक्ता शिंदे सध्या के.व्ही.पी.एस. बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, शिरपूर येथे प्रशिक्षक विजेंद्र जाधव व प्रा. भरत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व कठोर सराव करत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्राजक्ता शिंदे हिच्यासह राज्य पदक विजेते खेळाडू नयन सोनवणे, रोहित सोनवणे, ओम राजपूत, नताशा पावरा, नैतिक माळी यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष कैलास जैन, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रांधे, संचालक राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, शशांक रंधे, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र बोरसे, एसपीडीएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. गोराणे, डॉ. व्ही. एम. पाटील, पाराघोगरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास चव्हाण, केव्हीटीआर सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या श्रीमती सुरेखा मिस्त्री, समन्वयक सागर वाघ, क्रीडा संचालक डॉ. लिंबाजी प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील, सागर कोळी, क्रीडाशिक्षक नूर तेली, हेमंत शिरसाठ, राज्य पंच ऋषिकेश अहिरे, तसेच नाशिक विभागीय व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.





















