जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२५
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले असतानाच पत्रकार चेतन वाणी यांच्या पत्नी हेतल महेंद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक ६ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे संबंधित प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
हेतल पाटील या प्रभागातीलच रहिवासी असून ‘प्रभागाची लेक’ म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दैनंदिन अडचणी तसेच मूलभूत प्रश्नांची त्यांना सखोल जाण असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे. पत्रकार कुटुंबातील पार्श्वभूमीमुळे जनतेचे प्रश्न, प्रशासनातील कार्यपद्धती आणि लोकशाही मूल्यांची जाण त्यांना असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना हेतल पाटील यांनी विकास, पारदर्शक कारभार, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी संधी निर्माण करणे या प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. “जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या महापालिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणे आणि सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ६ अ मधील निवडणुकीची रंगत अधिकच वाढली असून पुढील काळात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.





















