जळगाव मिरर | २ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीपासूनच जोरदार आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. महायुतीमधील भाजपने खाते उघडल्यानंतर आता आणखी एक जागा बिनविरोध झाली असून प्रभाग क्रमांक ७-क मधून आमदार राजूमामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे भाजपच्या बिनविरोध जागांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. एकूणच महायुतीच्या आतापर्यंत पाच ते सहा जागा बिनविरोध झाल्याने विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
महापालिका निवडणुकीतील भाजपची ही दुसरी बिनविरोध जागा ठरली आहे. याआधी बुधवारी प्रभाग क्रमांक — मधून उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली होती. त्यानंतर आता विशाल भोळे यांची निवड बिनविरोध झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून विशाल भोळे यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले असून त्यांच्या निवडीने समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट)लाही बिनविरोध जागांचा लाभ झाला आहे. गुरुवारी शिंदे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १८-अ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, प्रभाग क्रमांक ९-अ मधून मनोज चौधरी, तर प्रभाग क्रमांक ९-ब मधून प्रतिभा देशमुख यांचा समावेश आहे. याशिवाय आज प्रभाग क्रमांक १९-अ मधून रेखा चुडामण पाटील यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महायुतीला मिळणाऱ्या या सलग बिनविरोध यशामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात महायुतीची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.




















