जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२६
कामाच्या शोधात घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबासोबत गुजरातमधील सूरत येथे अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी या कुटुंबाची कार अडवून त्यातील सदस्यांना जबरदस्तीने खाली उतरवले आणि एकापाठोपाठ एक खोल कालव्यात फेकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत एका पुरुषासह महिला आणि तरुणी अशा तिघांचे मृतदेह आढळले आहेत. तर कुटुंबातील दोन लहान मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. विशेष म्हणजे, कालव्यात फेकण्यात आलेल्या १३ वर्षीय मुलाने पाण्यातील पाईपचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला आणि हॉटेलमध्ये पोहोचून या भयानक घटनेची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जळगाव परिसरातील रहिवासी असलेले हे कुटुंब एरंडोल येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करत होते. दरम्यान, कामाच्या शोधात हे कुटुंब २१ नोव्हेंबर रोजी कारने सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान त्यांची कार गुजरातमधील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळील कालव्याच्या परिसरात पोहोचली. याचवेळी दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाचा रस्ता अडवला. त्यानंतर संशयितांनी कुटुंबातील सदस्यांना कारमधून जबरदस्तीने खाली उतरवले. त्यांना खोल कालव्याच्या पाण्यात फेकल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. काही क्षणांतच आनंदाने सुरू झालेला प्रवास मृत्यूच्या भीषण प्रसंगात बदलला.
या भयानक घटनेत १३ वर्षीय मुलाच्या हाताला कालव्यातील एक पाईप लागला. त्याने प्रसंगावधान राखत त्या पाईपचा आधार घेतला आणि पाण्यात बुडण्यापासून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर तो कसा-बसा कालव्याबाहेर आला आणि जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये पोहोचला. तेथे त्याने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हॉटेलमधील लोकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. या मुलाच्या माहितीमुळे संपूर्ण घटनेचा उलगडा होण्यास महत्त्वाची मदत झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी कालव्यामध्ये शोधमोहीम राबवली. या शोधादरम्यान महुआ तालुक्यातील डुंगरी परिसरातील काकरापार कालव्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचा समावेश आहे. मृतांची नावे नितीन पाटील आणि कविता पाटील अशी असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनी मृतदेहांची ओळख पटवली आहे. मात्र, कुटुंबातील आणखी दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी कालव्यातील पाण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयितांनी या कुटुंबाला लक्ष्य का केले? त्यांच्यात पूर्वीपासून काही वाद होता का? की अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी खंडिया, आभा, बंटी आणि आणखी एक अज्ञात व्यक्ती अशा एकूण चार जणांविरोधात बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयितांची भूमिका आणि घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. कामाच्या शोधात घराबाहेर पडलेल्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तीन जणांचा मृत्यू, दोन मुलांचे बेपत्ता असणे आणि एका १३ वर्षीय मुलाने मृत्यूच्या दाढेतून वाचवलेला जीव, या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.




















