जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२६
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गो रक्षकांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तेथे कारवाई करत असताना पोलिसांवर हल्ला झाला असून या प्रकरणी दोघांसह टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरखेड येथे शुक्रवारी गोमांस अवैद्यरित्या विक्री होत असल्याची माहिती गोरक्षकांकडून ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. यानंतर आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिस स्टेशनचे स.पो.नि. नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पो.हे.कॉ. रवींद्र रावते, संदीप ईश्वर पाटील, पो.कॉ. संदीप पोपट पाटील यांच्या पथकाने गोरक्षांसोबत तेथे छापा टाकला. त्याठिकाणी गोमांस विक्री होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी गोमांस विक्रेते ईस्त्राइल भिकन कुरेशी (वय ३५), शेख भिकन कुरेशी (वय ४६, दोन्ही रा. पिंपरखेड) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
या वेळी काही जणांच्या टोळक्याने पोलिस पथकांसह पंच आणि साक्षीदारांवर विटांचा हल्ला केला. या हल्ल्यात स.पो.नि. नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पो.हे.कॉ. रविंद्र रावते, संदीप ईश्वर पाटील, पो.कॉ. संदीप पोपट पाटील यांच्यासह नीलेश भिकन पवार, सिध्दार्थ दिलीप मोरे (दोन्ही रा. पिंपरखेड), नितीन शेलार असे ७जण जखमी झालेत. या सर्व जखमींवर चाळीसगावातील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचार करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांत ईखाइल भिकन कुरेशी, शेख भिकन कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांसह पंचावर हल्ला करणाऱ्या टोळक्यांविरोधातही दुपारी उशिरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांची धरपकड केल्याचे समजते.




















