पुणे : वृत्तसंस्था
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाचं सावट या वाढदिवसावर आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मला भेटवस्तू, पुष्पगुच्छ नको तर प्रतिज्ञा पत्र द्या असं आवाहन केलं, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या.
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी एका तरुणाने एक वेगळी संकल्पना राबवली आहे. त्याने आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी थेट स्वतः च्या रक्ताने पोर्ट्रेट काढून आपण किती कट्टर आहोत हे इतरांपेक्षा करून दाखवून दिलं आहे. सध्या या कट्टर शिवसैनिकाची सर्वत्र चर्चा होत आहे.स्वतः च्या रक्ताने पोर्ट्रेट काढणारा हा तरुण पुण्यातील धनकवडी येथील बालाजीनगर या ठिकाणचा आहे. या शिवसैनिकाचे नाव सारंग धारणे आहे. या तरुणाने स्वतः च्या रक्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट स्वतः काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सारंग धारणे याने दिलेल्या या आगळ्या – वेगळ्या शुभेच्छांमुळे आज दक्षिण उपनगरात त्याचीच चर्चा रंगली. माहितीनुसार, सारंग धारणे हे पोर्ट्रेट घेऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेला आहे. आज सारंग याचा देखील वाढदिवस आहे. याआधी देखील कट्टर शिवसैनिकांनी आपल्या रक्ताने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहेत. शिवसेनेला गळती लागली आहे, अशा परिस्थितीत अनेक शिवसैनिक आपल्या रक्ताने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपला ठाकरेंप्रती असणारा विश्वास दाखवत आहेत. नुकतेच आदित्य ठाकरे यांच्या शिर्डीत होणाऱ्या संवाद यात्रेदरम्यान शिवसेनेच्या एका मुस्लीम मावळ्यानं देखील स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र आदित्य ठाकरेंना दिलं. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यानं या पत्रात म्हटलं होतं.




















