जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२६
बी. यू. एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल, प्रेमनगर, जळगाव येथे दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास शाळेचे माननीय अध्यक्ष श्री. शिरीषजी रायसोनी, पालक-शिक्षक संघाचे सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. मनोज शिरोळे सर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक श्री. मनोज शिरोळे सर तसेच शिक्षकवृंद आणि पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांनी एप्रिल महिन्यापासून सुरू असलेल्या दहावीच्या अभ्यासक्रम व परीक्षेचा सविस्तर आढावा सादर केला. दरमहा घेण्यात येणाऱ्या चाचण्या तसेच एसएससी बोर्डाकडून उपलब्ध करून दिलेल्या उत्तरपत्रिकांवर आधारित चार प्रिलिम्स परीक्षा घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळा, शिक्षक आणि शालेय जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. कुमुदिनी पाटील यांनी आपल्या मनोगतात दहावीच्या वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तसेच प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास पालक-शिक्षक संघ व बी. यू. एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
तसेच पालक-शिक्षक संघाचे सदस्य श्री. मुसळे व इतर सदस्यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यास परीक्षेस उपयुक्त शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या वतीने प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यास माननीय चेअरमन, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांसोबतचा स्मरणीय फोटो फ्रेम भेट देण्यात आला, जो त्यांच्या शालेय जीवनाची कायमस्वरूपी आठवण ठरणार आहे.



















