जळगाव मिरर । ५ फेब्रुवारी २०२६
कार्यक्रमानिमित्त शेंदुर्णी येथे गेलेले रिक्षा चालक नासीर रशीद खाटीक (६३, रा. गेंदालाल मिल) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी १९ हजार ५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी गेंदालाल मिल परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे कार्यक्रम असल्याने नासीर खाटीक हे १ फेब्रुवारी रोजी तेथे गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ५ हजार ५०० रुपये किमतीच्या चांदीच्या साखळ्या असा एकूण १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी खाटीक यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. वीरेंद्र शिंदे करीत आहेत. दरम्यान या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




















