जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२६
रुग्णालयामध्ये दाखल असल्याची बतावणी करीत पॅथॉलॉजी लॅबमधून बनावट रिपोर्ट तयार करून दिल्लीच्या तरुणाच्या नावे वैद्यकीय विम्याची रक्कम मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अजिंठा चौफुली परिसरातील टायटन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. इम्रान बी. व नाईकवाडी जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली येथील तुघलकाबादमधील रहिवासी विजय संतराम गुप्ता (२५) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना जळगावातील टायटन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे दाखविण्यात आले. तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबमधून त्यांच्या नावाचे तपासणी रिपोर्ट घेऊन त्याद्वारे वैद्यकीय विमा मंजूर करून घेत ती रक्कम परस्पर हडपली. यातून आपली फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
वैद्यकीय विम्याची मुदत संपल्याने गुप्ता हे विमा नूतनीकरणासाठी गेले. विम्याचा लाभ घेतलेला नसल्यास मिळणारी सूट कंपनी देत नसल्याने सूट मिळविण्याविषयी त्यांनी आग्रह धरला. त्यावेळी त्यांनी विम्याचा लाभ घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता जळगावातील रुग्णालयाकडून त्यांच्या नावे विम्याचा लाभघेतल्याचे लक्षात आले. त्या वेळी त्यांनी दिल्ली येथे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून टायटन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. इम्रान बी. नाईकवाडी व जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता सदर हॉस्पिटल तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. त्यातील डॉक्टरांचा शोध घेण्यासह कागदपत्रे कशी मिळविली, लॅबचा रिपोर्ट घेताना कोणाचे नमुने घेण्यात आले, यासह विमा कंपनीकडून किती रक्कम मिळविली, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.




















