जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२६
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅट गेटसमोरील चौफुलीवर बुधवारी (दि. ७) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३० एए ४६५३ क्रमांकाची कार आणि एमएच १९ डीआर ०७९० क्रमांकाची दुचाकी यांच्यात हा भीषण अपघात झाला. ५०० मेगावॅट गेटसमोरील चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील दोन्ही जखमी निंभोरा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलविण्यास मदत केली. काही काळ चौफुलीवर
गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
५०० मेगावॅट गेटसमोरील चौफुलीवर यापूर्वीही वारंवार अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या मार्गावर वाढलेली वाहतूक आणि वाहनांचा सुसाट वेग यामुळे हा परिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. रस्ता ओलांडताना वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.





















