जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२६
बी फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या शाम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर, ह. मु. दौलत नगर) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड तालुक्यातील शाम पाटील हा तरुण शहरातील एका महाविद्यालयात बी-फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. तो दौलत नगरात मित्रासोबत खोली करुन राहत होता. रविवारी त्याचा मित्र बाहेर गेलेला असतांना शाम याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळच्या सुमारास शाम याचा मित्र रुमवर आला, परंतू दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा ठोठावत होता. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्या तरुणाने घटनेची माहिती घर मालकाला दिली. त्यानुसार त्यांनी रुमचा दरवाजा तोडला असता, शाम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोहेकॉ अजित पाटील, निलेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















