जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६
एआयच्या आधुनिक युगातही पारंपरिक हस्तकला तितक्याच ताकदीने जिवंत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण चोपडा येथील चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांनी साकारले आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मोरपंखावर अत्यंत सूक्ष्म अशा मिनीचर पद्धतीने महाराजांचे सरकारमान्य चित्र रेखाटून अभिवादन केले आहे.
केवळ 2″x2″ आकाराच्या मोरपंखावर अॅक्रिलिक रंगांच्या साहाय्याने 3.3 x 4.5 सें.मी. इतक्या लहान आकारात हे चित्र साकारण्यात आले आहे. चोपड्यात अशा प्रकारचे हे पहिलेच चित्र असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रातून महाराजांचे राजस व्यक्तिमत्त्व, तेजस्वी मुद्रा आणि राज्यकर्त्याचे दैदिप्यमान भाव अत्यंत बारकाईने आणि मेहनतीने उभे करण्यात आले आहेत.
अनिलराज पाटील यांनी आपल्या आगळ्या-वेगळ्या चित्रशैलीतून महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला अनोख्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावातही कलाकाराची जिद्द, कल्पकता आणि हस्तकलेचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कलाकृती रसिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरत आहे. “कला हीच कलाकाराचे जगणे असते, आणि कलाकारच कलेला जिवंत ठेवतो,” असा संदेश या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला आहे.




















