जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६
प्रेमनगर येथील बी. यू. एन. रायसोनी स्कूल (सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम) येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि प्रेरणादायी कार्य प्रभावीपणे साकार झाले.
या प्रसंगी इयत्ता चौथी ते नववीतील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी कार्डबोर्ड तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा उपयोग करून भव्य किल्ल्यांच्या एकूण ५२ प्रतिकृती साकारल्या. या प्रतिकृतींमध्ये बुरुज, तटबंदी, दरवाजे आणि भगवे ध्वज यांचे बारकाईने केलेले चित्रण विशेष लक्षवेधी ठरले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून शिवकालीन स्थापत्यकलेचे वैभव जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
तसेच इयत्ता पहिली ते तिसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची विविध चित्रशैलींमधून सर्जनशील मांडणी सादर केली. लहान वयातच इतिहासाविषयीची आवड आणि कलात्मक अभिव्यक्ती त्यांनी प्रभावीपणे दाखवून दिली. त्यांच्या चित्रांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. या उपक्रमाची पाहणी पर्यवेक्षक नगराज पाटील, प्रविण पाटील, स्वाती शिंदे आणि रुपाली साळुंखे यांनी केली. उत्कृष्ट किल्ले साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
हा संपूर्ण उपक्रम शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीषजी रायसोनी, श्री. उमेदजी रायसोनी तसेच मुख्याध्यापक श्री. मनोज शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयीची आवड, देशभक्तीची भावना आणि सर्जनशीलतेचा विकास होत असल्याचे स्पष्ट झाले. शिवरायांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून स्वराज्याच्या प्रेरणेचा दीप नव्या पिढीत प्रज्वलित होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.




















