
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६
बांभोरीजवळील बायपासवर शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या दुहेरी अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. पाळधीकडून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटल्यानंतर, एकेरी वाहतूक सुरू असतानाच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याने अपघातांची मालिका घडली. सुदैवाने या दुर्घटनेत वाहनचालक किरकोळ जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा (एमएच १९, सीवाय ८८९२) क्रमांकाचा आयशर भोकनी फाट्याजवळ अचानक नियंत्रण सुटल्याने उलटला. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू करून महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू असतानाच (एमएच १२, बीझेड ६१८९) क्रमांकाचा भरधाव ट्रक पुढील तीन ते चार वाहनांवर आदळला. त्यानंतर मागून येणारी वाहनेही एकमेकांवर धडकली. यात एका कारचाही समावेश आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे खोळंबली.
सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. काही वाहनधारकांनी कचरा डेपो परिसरातून वाहने जुन्या महामार्गाकडे वळवून पर्यायी मार्गाचा वापर केला. मात्र अनेकांना मार्ग उपलब्ध न झाल्याने रांगेतच थांबून वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत केली. या विचित्र दुहेरी अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.




















