
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६
शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला कडक आदेश दिले होते. या आदेशांनंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर साचलेला कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि बांधकामाचा खराब भाग पडून होता. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत होता, तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. यासंदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी महापौरांकडे विनंती केली होती. तसेच काही नगरसेवकांनीही तोंडी तक्रारींद्वारे या समस्येकडे महापौरांचे लक्ष वेधले होते.
केवळ आदेश नाही, तर प्रत्यक्ष देखरेख
नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला तातडीने हा कचरा हटवण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, केवळ आदेश देऊन न थांबता महापौरांनी स्वतः या कामाच्या पाठपुराव्याकडे लक्ष दिले आहे. आरोग्य विभाग आदेशांचे पालन योग्य रीतीने करत आहे की नाही, यावर त्यांचे बारीक लक्ष आहे.
कामाचा आढावा आणि गती
महापौरांच्या ‘फॉलो-अप’मुळे आरोग्य विभागाने यंत्रणा कामाला लावली असून, महामार्गावरील कचरा उचलण्याचे काम वेगाने सुरू आहे. विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापौरांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.




















