
जळगाव मिरर | १ मार्च २०२६
शहरातील यशोधन पार्क परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सिमेंटची कुंडी डोक्यात घालून एका ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे येथे हजर झाला. अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४७, रा. गोविंद कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) असे मृत व्यक्तीचे नाव असून रोहित पुरुषोत्तम भावसार (रा. नेब कॉलनी, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान अनिल सावकारे हे यशोधन पार्कजवळील एका सलून दुकानासमोर काही मित्रांसोबत मद्यपान करत बसले होते. त्याचवेळी रोहित भावसार तेथे आला. वेळ विचारण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन दोघांमध्ये झटापट झाली.
झटापटीदरम्यान अनिल सावकारे हे मद्यधुंद अवस्थेत खाली पडले. त्यानंतर संतापाच्या भरात रोहित भावसार याने जवळच पडलेली सिमेंटची कुंडी उचलून सावकारे यांच्या डोक्यावर दोन ते तीन वेळा जोरदार प्रहार केले. गंभीर दुखापतीमुळे अनिल सावकारे यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजता आरोपी रोहित भावसार हा स्वतःहून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे येथे हजर झाला. मृताचे भाऊ भागवत सावकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून, घटनेमुळे यशोधन पार्क परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून झालेल्या या खुनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.




















