
जळगाव मिरर | १ मार्च २०२६
जळगाव येथील आर आर विद्यालय मध्ये दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. देशभक्ती, त्याग आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका पी. एस. याज्ञिक होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक संजय पिले, एस. डी. पाटील, गिरीष रमणलाल भावसार व वाय. जी. चौधरी उपस्थित होते. प्रारंभी गुरु तेग बहादुर साहिब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. एस. साबळे यांनी केले. त्यांनी ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु तेग बहादुर यांच्या शौर्यगाथेचा व त्यागमय जीवनाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. जे. एम. पाटील यांनी गुरुजींच्या जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकत त्यांच्या धर्मस्वातंत्र्याच्या लढ्याची माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात पी. एस. याज्ञिक यांनी गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून घ्यावी, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. महाजन यांनी तर आभार प्रदर्शन के. जे. सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाय. बी. न्हासदे, एस. आर. महाजन व जी. आर. महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















