
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
शहरातील प्रेमनगर परिसरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सी.बी.एस.ई. पॅटर्न) येथे दि. २ मार्च २०२६ रोजी होळी सण उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देत शाळेत ‘दुर्गुणांची होळी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या विशेष उपक्रमात इयत्ता नर्सरी ते इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध वाईट सवयी आणि दुर्गुण फलक व चिठ्ठ्यांवर लिहून प्रतीकात्मक होळीत अर्पण केले. यामध्ये मित्रांशी भांडणे, वाईट अथवा अश्लील भाषा वापरणे, आई-वडील व शिक्षकांचा आदर न करणे, मोबाईल व टीव्हीवर वेळ वाया घालवणे, गृहपाठ अपूर्ण ठेवणे, कुठेही कचरा टाकणे, मोठ्यांचे न ऐकणे, इतरांबद्दल मत्सर बाळगणे तसेच शाळेचे नियम मोडणे अशा प्रवृत्तींचा समावेश होता.
या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वाईट सवयींचा त्याग करून चांगल्या गुणांचा स्वीकार करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज शिरोळे यांनी होळी सणाचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. होळी हा केवळ रंगांचा सण नसून, मनातील नकारात्मक विचार जाळून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्याचा संदेश देणारा उत्सव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रामाणिकपणा, शिस्त, आदरभाव आणि परस्पर सहकार्य यांसारख्या सद्गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष श्री. उमेद रायसोनी तसेच पालक-शिक्षक संघाच्या सदस्या सौ. ललिता टिपरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकमंडळाला होळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेत सकारात्मक बदलाचा संकल्प व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ‘दुर्गुणांची होळी’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जाणीव रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




















