
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ओवी परंपरेवर मार्गदर्शन, स्पर्धेत मोहिनी पालवे प्रथम
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
जामनेर येथून जवळ असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी येथे मराठी दिनानिमित्त ‘जात्यावरच्या ओव्या’ गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पारंपरिक लोकसाहित्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत सुमारे पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पारंपरिक ओव्या सादर केल्या. ग्रामीण संस्कृतीचा सुगंध असलेल्या ओव्यांनी शाळेचा परिसर भारावून गेला. ओवी या पद्यप्रकाराचा उगम आणि विकास या विषयावर सौ. करुणा महाजन यांनी सविस्तर विवेचन करत विद्यार्थ्यांना या काव्यपरंपरेची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी समजावून सांगितली.
स्पर्धेचा निकाल जाहीर करताना परीक्षकांनी सादरीकरणातील आशय, लय, उच्चार आणि सादरीकरण कौशल्य यांचा विचार केला. यात मोहिनी पालवे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रावणी नेवल हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मोहिनी पालवे, पूजा पाटील आणि प्रणाली खवडे यांनी मराठी दिनाचे महत्त्व आणि मराठी भाषेचा अभिमान याविषयी माहिती दिली. ग्रीन आर्मी प्रमुख विजय सैतवाल यांनी मराठी भाषा अधिक समृद्ध आणि व्यापक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व समाजाने कोणते प्रयत्न करावेत, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी एन. एस. पाटील आणि एन. जी. पाटील यांनी समयोचित भाषणे करत विद्यार्थ्यांना मातृभाषेचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. शेकोकार होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी नानोटे हिने केले, तर आभार प्रदर्शन प्रियंका खवडे हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ए. बी. पाटील, जी. ई. पाटील, आर. एल. कोळी, मनोज जैन यांच्यासह वैष्णवी बोरसे, भूमिका नानोटे, गीता कोळी, विराज जंगले, वैभव भोजने, प्रसाद घ्यार, हर्षल खुरपडे आणि गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. मराठी दिनानिमित्त पारंपरिक ‘ओवी’ या लोककाव्य प्रकाराला उजाळा देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.




















