
जळगाव मिरर | ११ मार्च २०२६
कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कंत्राटी कोरोना योद्ध्यांना शासन सेवेत विनाअट सामावून घेण्याच्या मागणीसाठी १२ मार्च रोजी मुंबई येथे जाण्याचे आवाहन कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.
या संदर्भात ७ मार्च रोजी पद्मालय शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे कंत्राटी कोरोना योद्ध्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरावर यापूर्वीही अनेक वेळा निवेदने व आंदोलने करूनही शासनाने कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
कोविड महामारीच्या काळात अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. अनेक वेळा नातेवाईकही कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळ जात नसताना या कोरोना योद्ध्यांनी देवदूताप्रमाणे काम केले. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ३ मार्च २०२१ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार कोरोनाकाळात किमान १०० दिवस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना विनाअट शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीत निलेश बोरा यांनी जिल्हा व तालुकास्तरीय समितीच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार विविध तालुक्यांतील प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली असून सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, येत्या १२ मार्च रोजी मुंबई येथे जाऊन राज्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कोविड योद्ध्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे जिल्हाध्यक्ष निलेश बोरा यांनी केले आहे. या बैठकीला निलेश बोरा, विनोद सपकाळे, युवराज सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक सपकाळे, रमेश वानखेडे (पारोळा), बबन सावळे, यश कुमावत यांच्यासह अनेक कंत्राटी कोविड कर्मचारी उपस्थित होते.




















