
जळगाव मिरर | १३ मार्च २०२६
शहरातील स्टेडीयम परिसरातील पोलीस लाईनसमोरील व आमदारांच्या कार्यालयालगत असलेल्या फर्निचर दुकानात चोरट्यांनी मंगळवारच्या रात्री घरफोडी करून रोकड व साहित्य लंपास केले. या घटनेत २२ हजारांची रोकड, पाच कुलर आणि अॅल्युमिनियमची शिडी असा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निळकंठ आनंदा नारखेडे (रा. नंदनवन कॉलनी, ख्वाजामिया दर्ग्याच्या मागे) यांचे बेंडाळे कॉलेजलगत असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये “हर्षल एजन्सी” नावाचे फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी सायंकाळी सुमारे ८ वाजता दुकान बंद करून आपल्या कर्मचाऱ्यासह घरी गेले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजता दुकानात काम करणारा संदीप पाटील (रा. ममुराबाद) हा कामगार घरून चावी घेऊन दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आढळले. ही बाब लक्षात येताच त्याने तत्काळ फोन करून मालक निळकंठ नारखेडे यांना याची माहिती दिली.
नारखेडे दुकानावर पोहोचल्यावर त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. काऊंटरमधील २२ हजारांची रोकड, मॅगो कंपनीचे पाच कुलर आणि अॅल्युमिनियमची शिडी असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी निळकंठ नारखेडे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार हे करीत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच पोलीस लाईन व आमदार कार्यालयालगत असलेल्या परिसरातच ही चोरी झाल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




















