
जळगाव मिरर | १३ मार्च २०२६
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता हळूहळू जगभर जाणवू लागला असून त्याचा फटका भारतालाही बसत आहे. युद्धामुळे इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर आता त्याचे पडसाद भाजी मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंट आणि विविध उद्योगांवर उमटू लागले आहेत. देशातील अनेक भागांत गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गॅस आणि पेट्रोल टंचाईनंतर आता दारूच्या तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे कॅन आणि काचेच्या बाटल्यांचा साठा अत्यंत कमी उरला आहे. सध्या हा साठा केवळ १५ दिवसांपुरता पुरेल, अशी माहिती उद्योग क्षेत्रातून समोर आली आहे.
मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम मद्यनिर्मिती उद्योगावर होत आहे. काचेच्या बाटल्या आणि कॅनचा पुरवठा वेळेवर न झाल्यास उत्पादन थांबण्याची शक्यता आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार उत्पादन बंद पडल्यास दरमहा सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे उद्योगपतींमध्येही चिंता वाढली आहे.
ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर केवळ उद्योग क्षेत्रालाच नव्हे तर बाजारातही परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काही दिवसांत दारूच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावाचे पडसाद आता स्थानिक उद्योगांपर्यंत पोहोचत असल्याने प्रशासन आणि उद्योग क्षेत्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.




















