
जळगाव मिरर | १४ मार्च २०२६
सांगवी पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या C.R. No. 289/2014 या पोक्सो प्रकरणातील एका संशयित आरोपी यास माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावचा रहिवासी असून ही घटना पुणे शहरातील सांगवी परिसरात घडली होती. या प्रकरणात भा.दं.वि. कलम 376(2)(f), 376(2)(i), 376(2)(n), 201, 325, 315, 504, 506, 34 तसेच POCSO कायद्याच्या कलम 3, 4, 9(l), 9(m), 9(n) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
फिर्यादीप्रमाणे आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून त्या अत्याचारातून ती गर्भवती झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नंतर तिने मृत बाळाला जन्म दिला असून त्या बाळाचा मृतदेह आरोपीने लपविल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी मागील ११ वर्षे ८ महिने कारागृहात असून खटल्यातील २८ साक्षीदारांपैकी केवळ २ साक्षीदारांचीच साक्ष नोंदविण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यासाठी असलेल्या किमान शिक्षेपेक्षा अधिक कालावधी आरोपी कारावासात असल्याचा मुद्दा बचाव पक्षाकडून मांडण्यात आला.
यापूर्वी सेशन्स कोर्ट, पुणे यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अॅड. किरण कावळे (पुणे) यांनी कामकाज पाहत दीर्घ कारावास, खटल्याची मंद गती तसेच न्यायालयीन प्रक्रियेचा कालावधी याबाबत सविस्तर युक्तिवाद मांडला. आरोपीचे वकील यांचा यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय उच्च न्यायालयाने आरोपीस रु. 30,000 च्या पी.आर. बाँडवर जामीन मंजूर केला असून आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. अॅड. किरण कावळे यांनी काम पाहिले.





















