
जळगाव मिरर | १६ मार्च २०२६
शहरातील गेंदालाल मिल परिसरातील दर्गाजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून बँक सेल्स ऑफिसरवर कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेत सेल्स ऑफिसरसोबत असलेल्या सहकारी युवतीलाही मारहाण करण्यात आली असून तीही जखमी झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंजरवाडा येथील रहिवासी असलेले मयुर रामसिंग दहीयेकर (वय २५) हे शहरातील महिंद्रा कोटक बँकेत सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. दि. १३ मार्च रोजी रात्री सुमारे सव्वानऊ वाजेच्या सुमारास ते गेंदालाल मिल परिसरातील दर्गा परिसरातून जात होते. त्यावेळी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून संशयित तिघांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत आरोपींनी हातातील कड्याने मयुर दहीयेकर यांच्या चेहऱ्यावर बुक्के मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी मैत्रिणीला देखील मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघेही जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर जखमींनी उपचार घेतल्यानंतर दि. १४ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहेत.




















