
जळगाव मिरर | १७ मार्च २०२६
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५-२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात भारती कृषि विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत एकूण ९९,९४८ शेतकऱ्यांनी सहभाग घेत १,०३,३६९ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले असून शेतकरी हिस्सा म्हणून ८७.६२ कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार अंबिया बहार हंगाम २०२५-२६ मधील केळी पिकांच्या विमा प्रस्तावांची पडताळणी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या (Remote Sensing Technology) माध्यमातून महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) मार्फत करण्यात आली. जळगाव, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, धरणगाव व जामनेर या सात तालुक्यांतील जास्त विमा क्षेत्र असलेल्या भागांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत ९१,८८० शेतकऱ्यांच्या ९६,१५७.२० हेक्टर विमा क्षेत्रापैकी ५०,२११.३३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष फळपिक आढळून आले, तर ४५,९४५.८७ हेक्टर क्षेत्रावर केळी पिक आढळून आले नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव योजनेच्या तरतुदीनुसार नामंजूर करण्याची प्रक्रिया विमा कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे.
यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडायचे असल्यास 23 मार्च 2026 पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्याचे असे आवाहन जिल्हास्तरीय आढावा समितीमार्फत करण्यात आले आहे. निर्धारित कालावधीत निवेदन सादर न केल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हास्तरीय आढावा समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भुसावळ, बोदवड, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा या आठ तालुक्यांतील फळपिक विमा प्रस्तावांची प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ७,२६७ शेतकऱ्यांच्या ७,०७४.३० हेक्टर क्षेत्रापैकी ४,१६० शेतकऱ्यांचे ३,८३०.५५ हेक्टर क्षेत्रावर फळपिक आढळून आले असून २,२३० शेतकऱ्यांच्या २,११८.२३ हेक्टर क्षेत्रावर पिक आढळून आलेले नाही. उर्वरित शेतकऱ्यांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. असे सदस्य सचिव, जिल्हास्तरीय आढावा समिती तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.




















