
जळगाव मिरर | २० मार्च २०२६
अमळनेर शहरात भरदिवसा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपुड फेकून लाखोंची रोकड लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लामा जिनिंगचे मालक यतीन विनोद कोठारी (वय ४८) हे २५ फेब्रुवारी रोजी दुचाकीने जिनिंगकडे जात असताना पिंपळे रोडवर ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली आणि त्यांच्या जवळील ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला.
या घटनेनंतर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपासासाठी विशेष सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धुळे येथील सराईत गुन्हेगार मनोज खुशाल उर्फ अशोक मोकळ (वय २६) याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून मोकळ याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.




















