
जळगाव मिरर | २१ मार्च २०२६
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांचे कॅप्टन खरातच्या डोक्यावर छत्री धरलेले फोटो व्हायरल झाले होते तर आज रुपाली चाकणकर यांच्या पदालाच या कॅप्टनमुळे कात्री लागली आहे.
या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ तसेच त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपला राजीनामा सुपूर्द केला. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली होती.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या प्रकरणी होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा निर्णय घेतला आहे.” दरम्यान, चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून, या प्रकरणाची चौकशी आणि पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















