
जळगाव मिरर । २१ मार्च २०२६
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
या प्रकरणात चाकणकर यांचा भोंदूबाबा अशोक खरात याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ तसेच त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत राजीनामा सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः जळगाव येथील अजित पवार गटाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आणि सरकारवरही कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी, तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून येत्या काळात या घडामोडींचे पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिभा शिंदे कोण आहेत?
जळगाव जिल्ह्यातील प्रतिभा शिंदे या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. दरम्यान प्रतिभा शिंदे यांच्या प्रवेशावरून काही अजित पवार गटातील नेते नाराज होते. कारण त्यांची पार्श्वभूमीवर वादाची राहिली आहे. गुन्हे दाखल आहेत,





















