जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२६
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची अल्पावधीतच दैनावस्था झाली आहे. नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत मनपाचे शहर अभियंता योगेश बोरोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून संबंधित ठेकेदाराकडून तातडीने रस्ते दुरुस्त करून घेण्यासह शहरात पीडब्ल्यूडीने केलेल्या रस्त्यांचा लेखाजोखा मागवला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील विविध रस्त्यांच्या विकासाचे काम ‘श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर, जळगाव’ या मक्तेदाराला देण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही काळातच रस्त्यांची चाळण झाली आहे. हे काम अद्याप दोष दायित्व कालावधीत आहे.
केवळ ५ रस्त्यांच्या दुरुस्तीवरच न थांबता महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात झालेल्या सर्वच कामांची माहिती मागविणे सुरू केले आहे. पीडब्ल्यूडीमार्फत शहरात आणखी कोणते रस्ते बनवण्यात आले, ते प्रत्यक्ष कधी पूर्ण झाले आणि त्यांचा दोष दायित्व कालावधी कधीपर्यंत आहे, या सर्व बाबींची सविस्तर माहिती आणि अहवाल तात्काळ मनपा कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश पत्रात देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात ५ प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये काव्यरत्नावली चौक ते राजमाता जिजाऊ चौक, डीमार्ट ते गिरणा पाण्याची टाकी ते लक्ष्मी संकुल, राष्ट्रीय महामार्ग ते कोल्हे नगर १०० फूट रोडपर्यंतचा पॉलिटेक्निक ग्राउंड लगतचा रस्ता, संभाजी नगर स्टॉप ते मोहाडी रोड आणि मोहाडी रोड ते संत गाडगेबाबा चौक ते पठाण बाबा दर्गाकडे जाणारा रस्ता या प्रमुख मार्गाचा समावेश आहे.





















