जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२६
अमळनेर येथील अंबरीष महाराज टेकडीवर प्रेमी युगुलांचा आणि त्यांना लुटणाऱ्या तरुणांचा पो.नि. दत्तात्रय निकम यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. या संदर्भात तीन महिला कॉन्स्टेबलसह दामिनी पथकाला गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबरीष महाराज टेकडी असंख्य झाडे लावल्याने ऑक्सिजन पार्क झाला असून जंगलही वाढले आहे. तर, निसर्गरम्य वातावरणात सकाळी आणि सायंकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पर्यटनस्थळ म्हणून लोक येथे फिरायला येतात.

मात्र, शहर व तालुक्यातील तसेच बाहेरगावच्या प्रेमी युगुल दाट जंगलाचा फायदा घेऊन अंबरीष महाराज टेकडीवर दुपारी प्रेमचाळे करायला येतात. हे प्रकार वाढल्याने आजूबाजूच्या परिसरातील टवाळ तरुण अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांचे गुपचूप फोटो व व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅक मेल करतात. हे प्रकारही वाढले होते. याबाबत अनेक तक्रारी पो.नि. दत्तात्रय निकम यांच्या कानावर पडताच त्यांनी ब्लॅकमेल करणाऱ्या टवाळखोर तरुणांना पकडून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच अंबरीष महाराज टेकडीवर येणाऱ्या प्रेमी युगुलांचाही चांगलाच समाचार घेतला. हे प्रकार नित्याचेच झाल्याने पो.नि. निकम यांनी नम्रता जरे, मोनाली पाटील, श्यामल पारधी या महिला कॉन्स्टेबल तसेच दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांना प्रेमी युगुलांच्या लव पॉईंटवर गस्त घालून त्यांचा पोलिसी भाषेत यथोचित सन्मान करण्याचे आदेश दिले आहेत.
एका मिरवणुकीत मद्य प्राशन करुन धिंगाणा घालत पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला भर चौकात खाकीचा हिसका दाखवण्यात आला. माळीवाड्यातील तरुण पवन चौकात सार्वजनिक ठिकाणी मद्याच्या नशेत गोंधळ घालत होता. त्याला समजवायला गेलेल्या पो. उ.नि. समाधान गायकवाड यांना त्याने धमकवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भर चौकात त्याला खाकीचा हिसका दाखवला. तसेच मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने व महाराष्ट्र दारूबंदी कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. प्रमोद पाटील करत आहेत.





















