
जळगाव मिरर | २३ मार्च २०२६
कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कंत्राटी कोरोना योद्ध्यांनी आता आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला आहे. कायमस्वरूपी नोकरी, आर्थिक भत्ता आणि पारदर्शक भरती प्रक्रियेच्या मागण्यांसाठी संबंधित कामगारांनी शासनाकडे निवेदन सादर केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अनुभवी कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमित पदावर प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, कायमस्वरूपी नोकरी मिळेपर्यंत दरमहा १० हजार रुपयांचा ‘कोरोना योद्धा भत्ता’ सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे कारण देत कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आरोग्य विभागात सामावून घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM-NHM) तसेच इतर योजनांअंतर्गत रिक्त असलेल्या पदांवर कक्षसेवक, बेड सहाय्यक, अॅम्ब्युलन्स चालक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), आया आदी पदांवर त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, स्मार्ट कंपनीमार्फत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवरही कामगारांनी गंभीर आरोप केले आहेत. अनुभवी कंत्राटी कामगारांना डावलून वशिल्याबाजी आणि ओळखीच्या व्यक्तींना संधी दिल्याचा आरोप करण्यात आला असून ही भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मार्फत समिती स्थापन करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नव्याने भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी आणि शासनस्तरावर अंतिम निर्णय होईपर्यंत अनुभवी कोरोना योद्ध्यांना स्मार्ट कंपनीमार्फत तातडीने कामावर रुजू करून घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कोविड काळात सेवा बजावलेल्या अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांना सध्या डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, उर्वरित कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर घेण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





















