जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२६
जिल्हा परिषद, धुळे येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणी करून देण्यासाठी तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसमाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई १२ ऑगस्ट २०२६ रोजी पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा परिषद धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील फिटर तसेच खासगी इसमाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, २८ वर्षीय तक्रारदार हा गेल्या सुमारे १४ महिन्यांपासून जिल्हा परिषद, धुळे येथे सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत आहे. शासनाच्या नियमानुसार खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून सलग काम केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याची प्रक्रिया असते. तक्रारदारासह अन्य चार सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासाठी आरोपींकडून कथितरीत्या पैशांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून प्रत्येक सुरक्षा रक्षकामागे १ लाख ५० हजार रुपये, अशा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यापैकी तक्रारदाराने यापूर्वी १ लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही काम न झाल्याने तक्रारदाराने पुन्हा संबंधित आरोपींशी संपर्क साधला.
८ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदाराने आरोपी अलोसे पुरुषोत्तम वाघ यांची त्यांच्या सुपरवायझर बारकू पाटील यांच्यासह भेट घेऊन कामाबाबत विचारणा केली. त्यावेळी उर्वरित रकमेपोटी ६ लाख ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीअंती ४ लाख ८० हजार रुपये देण्याचे ठरले. यापूर्वी १ लाख रुपये स्वीकारले असल्याने उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये खासगी इसम बारकू पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर ११ व १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद, धुळे येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
१२ ऑगस्ट रोजी पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे खासगी इसम बारकू कळू पाटील (वय ६०) याने तक्रारदाराकडून ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारली. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील आरोपींमध्ये अलोसे पुरुषोत्तम मंगाजी वाघ (वय ४०), व्यवसाय—नोकरी, फिटर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, धुळे तसेच बारकू कळू पाटील (वय ६०), खासगी इसम, सुरक्षा एजन्सी यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने कळविले आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी काम पाहिले, तर पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. सापळा पथकात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.




















