
जळगाव मिरर | २५ मार्च २०२६
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले असताना, आता या निधी वितरणाला हिरवा कंदील मिळाला आहे.
सामाजिक न्याय विभागाने या योजनेसाठी तब्बल 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, येत्या काही दिवसांत हा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. यापूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता.
दरम्यान, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अर्ज करताना अनेक महिलांकडून तांत्रिक चुका झाल्याचे समोर आले होते. चुकीची माहिती भरल्यामुळे काही महिलांच्या लाभावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ई-केवायसी दुरुस्तीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आपली माहिती सुधारण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
ई-केवायसी प्रक्रिया मोबाईल किंवा संगणकाद्वारे सहज पूर्ण करता येते. मात्र, अद्यापही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा परिस्थितीत त्यांचा हप्ता थांबण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे, ई-केवायसी सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचेही दिसून आले आहे. ज्या महिलांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे.
त्यामुळे सर्व पात्र महिलांनी शासनाने दिलेल्या मुदतीत आपली कागदपत्रे आणि माहिती अचूकपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे. असे केल्यास फेब्रुवारीसह पुढील हप्तेही नियमितपणे खात्यात जमा होतील.




















