
जळगाव मिरर | २५ मार्च २०२६
जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता राखणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे विहित मुदतीत प्रभावी निवारण करणे यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती’ची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत समितीकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती, त्यावर करण्यात आलेली कार्यवाही तसेच पुढील आवश्यक उपाययोजना याबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तक्रारींची वस्तुनिष्ठ व गुणवत्तापूर्ण चौकशी करून वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये नियमबद्ध व ठोस कार्यवाही करण्यावर भर देत, प्रत्येक तक्रारीचा गांभीर्याने विचार करून विहित मुदतीत निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व लोकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.





















